Tuesday, October 10, 2006


अमर आलिंगन...

रविवार सकाळची वेळ होती,

मी हॉलमध्ये पेपर वाचत बसलो होतो;

ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,

"चहा घेणार का तुम्ही? " असं मला म्हणाली;

मी तिच्याकडे न बघताच "हो" म्हणालो,

आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो;

माझ्या जवळून जाताना तिने केसांना नाजुक झटका दिला,

त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला;

मी उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,

तिनंही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले;

मी हळूच उठलो खुर्चीवरुन आणि स्वयंपाकघरात आलो,

तिनं माझ्याकडे बघावं म्हणून फ्रिजवर तबला वाजवू लागलो;

तिनं मात्र मागे न बघताच चहाचं आधण ठेवलं,

आणि मग मला चिडवण्यासाठी आपलं नाक उडवलं;

तिच्या पाठमोर्‍या रुपाकडे बघत मी क्षणभर तसाच थांबलो,

उगाच तिला दुखावले म्हणुन स्वतःच्याच मनाशी भांडलो;

हळुच मग मागुन जाऊन मग मी तिच्या कमरेला विळखा घातला,

पण गडबडीत चहाच्या भांड्याला लागुन हात माझा भाजला;

मी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,

चावटपणाची वेडी लहर माझ्या मनात मग उठली;

मी जखडले तिला मिठीत,

ती म्हणाली "जाऊ द्या ना!"

मी म्हणालो तिला "तुला माझ्यात सामवू दे ना!"

ती लाजुन म्हणाली "अहो असं काय करता? चहा उकळतोय!"

मी म्हणालो "उकळू दे! इथं माझा जीव जळतोय!"

"अहो असं काय करता? दूध उतू जाईल ना!"

"कशाला काळजी करतेस मी परत आणुन देईन ना!"

ती उगाच कारणं देत होती, मी प्रत्येक कारण उडवत होतो,

तिला अजुनच जवळ घेत, माझ्या मनासारखं घडवत होतो;

शेवटी तिनं कारण दिलं "अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय"

मी म्हणालो "हो का! मला वाटले की माझा चावटपणा अती होतोय"

तेवढ्यात दाराची कडी वाजली,

मी मनातल्या मनात बाहेरच्याला इरसाल शिवी घातली;

तिनं झटकन स्वतःला माझ्या तावडीतुन सोडवून घेतलं,

आणि हळूच मला धक्का मारुन, स्वयंपाकघराबाहेर लोटलं;

मी वैतागानं दार उघडलं समोर कचरावाला दिसला,

माझा खांद्याशी ओला झालेला शर्ट पाहुन तो पण गालात हसला;

मी कचरा देऊन झटकन दार लावून घेतलं,

पण मागेवळताक्षणी काहितरी विचित्र घडणार आहे, असं मला वाटलं;

पहिले मला स्वयंपाकघरातुन, दूध जळण्याचा वास आला,

नंतर कान दणाणुन सोडणारा, सिलेंडरचा स्फोट झाला;

मी धावत आत गेलो, माझं ह्रदय धडधडत होतं,

माझ्या डोळ्यांदेखत तिचं पातळ आगीवर फडफडत होतं;

मी तिला उचलून घेतलं, डोळे माझे झरत होते,

तिच्या करपलेल्या कायेवरून हात माझे फिरत होते;


मोठ्या कष्टानं तिने डोळे उघडले,मला पाहुन तिच्या ओठांवर, हास्य मग विलसले;

ती म्हणाली मला "एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना!"

"मरण्यापुर्वी मला, तुमच्यामध्ये सामावू द्या ना!"

मी कवटाळले तिला उराशी, अन देवाचे स्मरण करु लागलो,

ती वाचावी म्हणुन त्याची करुणा भाकू लागलो;

पण दूध उतू गेलं होतं, ओटा मात्र फेसाळला होता,

आम्हा दोघांचं अमर आलिंगन पाहुन, तिचा मृत्युही क्षणभर रेंगाळला होता....

मी तुझा जाहलो....

भावना उरीच्या, सदैव जागवत आलो;
वेदनांना माझ्या मी, मित्रांसारखे वागवत आलो....

झालो प्रसन्न मी, तुझ्या एकाच आठवणीने;
पुन्हा त्या जुन्या क्षणांना, ह्रदयी माझ्या सजवत आलो....

झाली अपेक्षापूर्ती, तुला एकदा पाहण्याची;
वेड्या माझ्या मनाला, नजरेत तुझ्या भिजवत आलो....

जाहलो मी सर्वस्वी तुझा, पळभराच्या द्रुष्टीभेटित;
काळजात माझ्या मी, प्रेम तुझ्यासाठीचे रुजवत आलो....

गीत सांत्वनाचे.....

मी गाईन गीत, माझे आसवांचे;
रुजवीन सूर त्यात, माझ्या वेदनांचे.....

तू जग तुझे जीवन, तुझ्या मनासारखे;
मी आवरेन वादळ, माझ्या ह्रदयीच्या भावनांचे.....

तुझी साथ लाभण्याचे, भाग्यच नाही माझे;
काटे माझे सोबती, तुझे रस्ते फुलांचे.....

समजेन असे की, मी नव्हतोच तुझ्या लायकीचा;
माझं ह्रदय एक फुटकळ मोती, तुझे नशीब तारकांचे.....

मरेन मी आता, तुझ्या आठवणींमध्ये झुरत;
संपवू शकतील न ज्वाळा, माझे गीत सांत्वनाचे.....

तो... तू.... आणि मी...

तो असाच अवेळी यायचा...
तुला उगाच भिजवून जायचा...
मी शहारायचो जेव्हा तो तुला स्पर्शायचा...
रक्ताचा कण-कण अगदी पेटून उठायचा...
पण मीही अगदी असहाय्य असायचो....
कारण... कारण तो तुला आवडायचा...
तुला आवडायचा म्हणून मला नावडायचा..
एक मात्र खरं, तो खूप दिलदार होता...
तुझ्यावर माझ्याइतकंच, मनापासुन प्रेम करायचा...
तो आला की तू, त्याच्याशी अखंड गप्पा मारायचीस...
स्वतःला विसरून, त्याची होऊन जायचीस...
आणि मी.... मी मात्र त्याच्या जायची वाट बघत राहायचो...
तो लवकर जावा म्हणून, प्रार्थना करायचो...
पण तोही पठ्ठ्या तुझाच प्रेमी...
तुला भेटायला त्याला वेळेचे बंधन नाही...
तुला पुर्ण आपलीशी केल्याशिवाय, तो काही जायचा नाही...
तुही त्याची झाल्याशिवाय, भानावर यायची नाहीस...
मग हळूहळू तो, माझ्या डोळ्यात दाटू लागायचा...
तुझ्या कानात हळूवारपणे, माझ्या मनाचं गुपित सांगायचा...
मग तुला अलगद, माझी आठवण व्हायची...
तू माझ्याजवळ येऊन, मला मग बिलगायचीस...
तुला माझ्या जवळ बघुन, तो हिरमुसला व्हायचा...
त्याच्या जाण्याची, मग तयारी करु लागायचा...
तरीही जाण्यापुर्वी, तो माझ्याकडे बघुन हसायचा...
शत्रू असुनही माझा, पाऊस माझ्याशी मित्रासारखा वागायचा...

तू माझी ध्रुव चांदणी....

मी राजा तुझ्या मनाचा, तू माझ्या स्वप्नांची राणी;
मी चंद्र शीतल या नभीचा, तू माझी ध्रुव चांदणी....

माझी नजर नेहमीच, तुझ्या ह्रदयाला साद घालते,
माझी व्याकुळता आता फक्त, तुझीच साथ मागते;
तुझीच मूर्ती पुजतो मी, माझ्या मनाच्या राऊळी,
मी चंद्र शीतल या नभीचा, तू माझी ध्रुव चांदणी....

तुझ्या शिवाय या ह्रदयाला, आता काहीच सुचत नाही,
तुझ्यासाठीच्या हळवेपणाशिवाय, या मनात काहीच रुजत नाही,
माझ्या भावनांचे साम्राज्य मी, करतो अर्पण तुझ्याच चरणी,
मी चंद्र शीतल या नभीचा, तू माझी ध्रुव चांदणी....

भर दिवसा आता मला, तुझीच स्वप्नं पडतात,
रोज रात्री निद्रेअभावी, तुझीच स्मरणं घडतात;
माझी बनावीस तू अर्धांगी, हीच आता मागणी,
मी चंद्र शीतल या नभीचा, तू माझी ध्रुव चांदणी....

अमृताचे थेंब....

बोलण्यासारखे खुप आहे, सांगण्यासारखे काहीच नाही;
करण्यासारखे खुप आहे, होण्यासारखे काहीच नाही.....

कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे, दुखण्यासारखे काहीच नाही.....

उभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसलो नाही तुला तर, बघण्यासारखे काहीच नाही.....

तुला नेहमीच वाटत असेल, मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे, कळण्यास अवघड काहीच नाही.....

माझ्या नेत्रांतील आसवांची, तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत, नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत....

जाणीव....

आज पुन्हा व्यथा, जाणवायला लागली आहे,
पुन्हा भरभरुन तुझी आठवण, यायला लागली आहे....

जीवापाड जपली होती, मनावरची खपली,
आज पुन्हा तीच जखम भळभळून, वहायला लागली आहे....

खूप कष्टाने, आवरले होते मी आसवांना,
आज पुन्हा पापणी, ओली व्हायला लागली आहे....

विसरु पहात होतो, त्या मोहक क्षणांना;
वेदना ओठांवर माझ्या, हास्य आता फुलवायला लागली आहे....

कळलेच नाही मला, कसा जगलो मी तुजविना,
जाणीव मृत्युची आता, मला व्हायला लागली आहे....

Sunday, October 08, 2006

वाईट तुला वाटणार नाही ना?

मी प्रेम केलं तुझ्यावर तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
झालो वेडा तुझ्याचसाठी तर, वाईट तुला वाटणार नाही ना?

जाणीव तुझ्या मनाची, आहे मजला तरीही;
कास प्रेमाची धरली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?

माझ्या भावनेचीही कधी, करुन बघ तू किंमत;
अनमोल जर ती ठरली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?

राहूदे प्रारब्ध, क्षणभर तरी बाजुला;
आस तुझीच धरली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?

तुझ्या आयुष्याचा निर्णय, सर्वस्वी तुझाच आहे;
पण वाट तुझी मी पाहीली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?

पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी........
तू मोहक हसतोस, तेव्हा मी हरखुन जाते;
भोवतालचे जग, अगदी विसरुन जाते;
तुझ्या हास्यासारखेच निर्भेळ प्रेम मला देशील का?
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

तुझ्या श्वासाचा गंध, मला मुग्ध करतो;
तुझ्या नजरेतला अवखळ भाव,मला निःशब्द करतो;
तुझ्या या स्वप्नील डोळ्यात, तू मला बद्ध करशील का?
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

तुझी निरागसता, माझ्या मनाला भावते;
तुझी रसिकता, माझ्या ह्रदयाला भुलावते;
तुझ्या स्वभावासारखेच निर्मळ, आयुष्य माझे करशील का?
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

तुझ्या मिठीत मला, स्वर्ग सापडतो;
तुझ्या सहवासात, भावनांचा आविष्कार घडतो;
तुझ्या या निर्मय जीवनाची, अर्धांगी मला करशील का?
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

तू विसरु शकशिल का?

ते गोड क्षण,
माझं हळवं मन;
तुझी अखंड बडबड,
आणि माझं नि:शब्द मौन.
तू कसं विसरु शकतेस?

तूझं मुग्धपणे हसणं,
हसताना मोहक दिसणं;
तुला डोळ्यात साठवताना,
माझं भान हरपणं.
तू कसं विसरु शकतेस?

तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,
घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;
तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,
माझं तुझी समजुत काढणं.
तू कसं विसरु शकतेस?

आपलं ते चांदण्यांखाली जागणं,
तुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;
जन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,
तुझा हात माझ्या हातात गुंफणं.
तू कसं विसरु शकतेस?

माझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,
तुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;
तरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,
माझं रात्र रात्र जागणं.
तू कसं विसरु शकतेस?

तू कसं विसरु शकतेस;
माझं प्रेम,
माझ्या भावना,
माझं मन,
माझ्या वेदना.
सांग, तू विसरु शकशिल का?

मी मरेन तेव्हा.....

मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?
एकान्तात का होइना, पण माझ्यासाठी, दोन अश्रु गाळशील का?

माझ्या नावाचं मंगळसुत्र, तू नाही घातलं तरी;
माझ्यासाठी एक दिवस, तू वैधव्य पाळशील का?

जन्मभराची साथ, नाही मिळाली तरी चालेल;
पण माझ्या शवयात्रेत, तू दोन पावलं चालशील का?

माझ्यासाठी तू, कोमेजली नाहीसच कधी;
शेवटी माझ्यावर, तू दोन फुलं उधळशील का?

विचार करायला, उसंत मिळाली तर्;
माझ्या आठवणी कधी, उराशी कवटाळशील का?

मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?.....

तू परत ये......

तू चुक मान्य करणार नाहीस हे मला माहीत आहे,
म्हणुनच मी उगाच तुझी समजुत काढणार नाही;

तू परत यावीस असं मला मनापासुन वाटतं,
अजुनही तुझ्या आठवांचं आभाळ मनामध्ये दाटतं;

माझ्या सहवासातला प्रत्येक क्षण तुला हेच सांगेल,
तुझ्याकडे तुझ्याचसाठी, माझी साथ मागेल;

बघ, कोपर्‍यावरचा प्राजक्तही तुझ्या वाटेकडे डोळे लावून फुलायचा थांबलेला आहे,
किमान त्याच्यासाठीतरी तू परत ये.......